महाराष्ट्रात लढाऊ बाण्याचा प्रदेशाध्यक्ष द्या; विजय वडेट्टीवारांची सोनिया गांधींकडे मागणी!

विजय वडेट्टीवा

नवी दिल्ली:- २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.

संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत खासदार राजीव सातव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, मंत्री विजय वडेट्टीवार आदी नेत्यांची नावे शर्यतीत आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर अजूनही थोरात हे कायम आहेत. मात्र, नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडी बाबत अजूनही ठाम निर्णय झालेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत भेट घेतली आहे. मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांनी पवारांची भेट घेतली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करायची ठरवल्यास तो लढाऊ बाण्याचा असावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विदर्भाचा अध्यक्ष झाल्यास आनंद वाटेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार यांनी आज दिल्लीत काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांची भेट घेतली. या बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा. तसेच आपण के.सी.वेणुगोपाल यांच्याशी पक्ष संघटना व ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा केल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या