‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’

बुलढाणा : समृद्धी महामार्ग हा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून जाणार आहे. तसे झाले तर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या हीच राष्ट्रमाता जिजाऊ आणि आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना ठरणार असल्याचे सांगत समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या वेळी ते बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणले की, ‘ऐतिहासिक कर्जमाफी करताना वापरात आलेले सरसकट, तत्वत: इतके भारदस्त शब्द संघातूनच आले असावे बहुदा. सरसकट कर्जमाफी केली असे सरकार म्हणतंय खरं. पण बोटावर मोजता येईल इतक्या शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झालेला नाही.

आज महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. गावागावात पाण्याच्या टँकरची मागणी केली जात आहे. मात्र ती पुरवली जात नाही. दुष्काळसमयी शेतकऱ्यांना काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे, मात्र नरेगा अंतर्गत कोणतेच काम सरकार देत नाही, असेही मुंडे यावेळी म्हणाले.