पृथ्वी शॉ ला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

prithwi_show

टीम महाराष्ट्र देशा- अंडर-19 टीमचा कर्णधार पृथ्वी शॉ आपल्या घरात तो हक्काच्या चार भिंती आणि एका छतापासून वंचित आहे. त्यामुळे मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर मिळावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासंबंधी ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

पृथ्वी शॉ आधी विरारला राहत होता. मात्र, त्यानं 2013 ला हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा फटकावल्यानंतर आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली. मात्र, ही जागा अपुरी असून ती कायमस्वरुपी वास्तव्यासाठी नाही. त्यामुळे पृथ्वीला हक्काचं घर देऊन त्याला सन्मान द्यावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पृथ्वीनं या विश्वचषकात सहा सामन्यांमधल्या पाच डावात 261 धावांचा रतीब घातला. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. तर 94 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर-19 टीमचा विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. या विश्वचषकात पृथ्वी एक फलंदाज आणि एक कर्णधार म्हणूनही प्रकर्षानं चमकला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं सहापैकी सहा सामने जिंकून विश्वचषकावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

Loading...