माहूरमधील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजाऱ्यांना स्थान द्या, तृप्ती देसाईंची मागणी

trupti desae

नांदेड : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या महिलांच्या प्रश्नांविषयी नेहमी आक्रमक असतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी धार्मिक ठिकाणी महिलांच्या प्रवेशाविषयी आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र, आता त्यांनी मंदिरात महिलांना प्रवेश तर हवाच. शिवाय मंदिरात महिला पुजारी पाहिजेत अशी मागणी केली आहे.

साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात एकही महिला पुजारी नाही. शक्तिपीठ देवीचे असूनही देवीला अभिषेक, साडी, मंगळसूत्र घालण्याचे काम पुरुष पुजारी करतात. या ठिकाणी ५० टक्के महिला पुजारी हवेत, अशी मागणी मंदिर विश्वस्तांकडे करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला पुजारी घेऊन राज्यात आदर्श निर्माण करावा, मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.

त्या म्हणाल्या की, महिलांना मासिक पाळी येत असल्याने त्यांना पुजारी म्हणून घेतले जात नाही, असे कारण सांगितले जाते. परंतु, स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. ही आंदोलनाची भूमिका असून माहूर येथील महिला नगरसेविकांसोबत यासंबंधी चर्चा करण्यात आली. मंदिराच्या विश्वस्तांमध्येही महिलांचा समावेश झाला पाहिजे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

राज्यात अनेक भागांत गरीब कुटुंबातील मुलींचे हुंड्यापायी वेळेत लग्न होत नाही, तर लग्नानंतर अनेकांचे संसार मोडतात. यासाठी युवराज ढमाले कॉर्प आणि भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब, गरजू मुलींच्या लग्नासाठी मदतीचा धनादेश दिला जात आहे. त्याची सुरुवात नांदेडमधून करण्यात आली. सहा मुलींना या ठिकाणी प्रत्येकी १५ हजारांचे धनादेश देण्यात आले. याचा आदर्श शासनाने घेऊन मदत केली पाहिजे, असे देसाई म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या