बारामतीच्या लेकीला एकदा संधी द्या, या संधीचे नक्की सोने करुन दाखविन : कांचन कुल

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघातून युतीकडून भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला जोरदार सुरवात केली. आज बारामती येथे बारामतीच्या लेकीला एकदा संधी द्या, या संधीचे नक्की सोने करुन दाखविन असा विश्वास दाखवत कांचन कुल यांनी प्रचाराला सुरवात केली.यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल यांना विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी समुदायाला केले.

यावेळी चंद्रकांत पाटीलांनी मोदी सरकारने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांच्या पावत्या दिल्या. यावेळी पाटील म्हणाले की, पिकविम्याची व्याप्ती वाढविल्यामुळे ८७ लाख शेतक-यांना पिकविम्याचा लाभ घेत आला आहे. तसेच २०१४ पर्यंत ३२ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले होते. साडेचार वर्षात त्यात तब्बल आठ लेख हेक्टरची वाढ मोदी सरकारने केली आहे. तसेच या राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी राज्य शासनाने केली असून ५२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.

मोदी सरकारने या पाच वर्षात पाच कोटी मोफत गॅसचे कनेक्शन दिले असून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे निर्णय घेतले. मराठा समाजाला आरक्षण देत नोकरी मध्ये आरक्षण प्रक्रीया सुरु ठेवली आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. गेल्या साडेचार वर्षात राज्यात लाठीमार किंवा गोळीबार झालेला नाही, असे दाखले देत चंद्रकांत पाटील यांनी कांचन कुल यांच्या प्रचारात रंगत वाढवली.

दरम्यान यंदा बारामती लोकसभेला आघाडी कडून सुप्रिया सुळे आणि युती कडून कांचन कुल निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवार खुद्द बारामतीच्या असल्याने या लढतीत विशेष रंगत पाहायला मिळणार आहे. परंतु बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा म्हणजेच सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला असल्याने कांचन कुल यांना ही लढाई काहीशी जड जाणार आहे.