केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव द्या – मनसे

mns raj aanandibai joshi

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोशी यांच्या १५३व्या जन्मदिनी महापालिकेकडं केली आहे.

आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली आणि आनंदीबाईंनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.१८८३ म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये प्रवेश मिळाला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी मिळवली.ज्या काळात महिलांनी बाहेर पडणंही दुरापास्त होतं त्यावेळी आनंदीबाईंनी थेट डॉक्टर होण्यापर्यंतची मजल मारली होती.आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवली.

जोशी यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव व्हावा या हेतूने ‘केईएम’ला डॉ. जोशी यांचं नाव देण्याची मागणी करणारं निवेदन मनसेनं याआधीही दिलं होतं. आज डॉ. जोशी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त मनसेनं या मागणीचं पालिकेला स्मरण करून दिलं आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन समाजव्यवस्थेच्या स्त्रीविषयक गैरसमजुतींना छेद देत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना मनसेनं जयंतीनिमित्त अभिवादन केलं. केईएम रुग्णालयाला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी पुन्हा पालिकेकडं केली. या मागणीच्या निवेदनाचं ट्विट त्यांनी केलं. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई महापालिका आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना टॅग केलं आहे. केईएम रुग्णालयाचं नाव ‘डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय’ करण्यात यावं, या मागणीचं निवेदन मनसेनं दिलं होतं. आज आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त या मागणीची महापालिकेला आठवण करून देत आहोत, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.