शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा : ‘देशातली सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबवली जाणारी योजना यशस्वी करुन दाखवा,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही सूचना दिल्या.

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ठाकरे ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आले होते. तेथे त्यांनी कर्जमाफीविषयीची पहिली बैठक घेतली. याचप्रमाणे राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलच्या आत पूर्ण करा, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्षात सुरूवात करा, असे निर्देश दिला.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘२१ फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. याद्या पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने चांगली वागणूक द्यावी. त्यांच्याशी सौजन्याने वागा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. तक्रारी असतील तर स्थानिक पातळीवर सोडवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण होणाऱ्या ठिकाणी प्रशिक्षीत कर्मचारी ठेवावा. बायोमॅट्रिक मशिन तपासून घ्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.