ती जन्मली आणि तिला अवघ्या ६ मिनिटांत आधार कार्ड मिळाले

आधार कार्डची दिवसेंदिवस सक्ती केली जात आहे. मेरा आधार मेरी पहचान या ब्रीदवाक्या खाली आधार सक्ती केली जात आहे. पण आधार काढण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. पण उस्मानाबाद येथील एका चिमुरड्या जीवाला तिच्या जन्मानंतर अवघ्या ६ मिनिटात आधार कार्ड मिळाले आहे.
भावना संतोष जाधव या मुलीचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रूग्णालयात  (रविवार) दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला. त्यानंतर १२ वाजून ९ मिनिटांनी तिला आधार क्रमांक मिळाला. होय जन्म झाल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात तिला तिचा आधार नंबर मिळाला आहे. तिच्या आई वडिलांनी याबाबत सजगता दाखवल्याने हे शक्य झाले आहे.

भावनाच्या आई वडिलांनी तिच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. त्यानंतर त्यांना तिचा जन्माचा ऑनलाईन दाखला आणि आधार नंबर मिळाला. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तर्फे तातडीने तिच्या जन्माची नोंद करण्यात आली अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘

लवकरच आम्ही सगळ्या लहान मुलांचे आधार क्रमांक त्यांच्या आई वडिलांच्या आधार क्रमांकाशी जोडणार आहोत. आज जन्मलेल्या भावनाची आणि तिच्या आईची प्रकृती आता चांगली आहे अशी माहिती रूग्णालयातील डॉक्टर एकनाथ मळे यांनी दिली. एवढेच नाही तर मागील वर्षभरात उस्मानाबाद मध्ये १३०० मुलांनी जन्म घेतला या सगळ्यांना आधार क्रमांक मिळाले आहेत असाही दावा डॉक्टर मळे यांनी केला. आता भावना जाधव ही भारतातील सर्वात कमी वेळेत आधार क्रमांक मिळवणारी व्यक्ती ठरली आहे.

Loading...

1 Comment

Click here to post a comment