जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी अनेक प्रकल्पांना चालना : महाजन

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्य शासनाने राज्यातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले असून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागास 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. या निधीच्या माध्यमातून होणाऱ्या कामांमुळे भावी पिढीला दुष्काळ बघावा लागणार नाही अशी सिंचनाची कामे केली जातील असे सांगून गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन राज्याचे वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज जिल्हावासियांना केले.

भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गुरुमुख जगवाणी, आमदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर सिमा भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, लहानमुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले की, गेल्यावर्षी आपल्या जिल्ह्यात पावसाची स्थिती चिंताजनक होती. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये चांगला साठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सिंचनाची क्षमता वाढावी याकरीता शेळगाव बॅरेज व वरखेड लोंढे प्रकल्पाचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला आहे. गिरणा नदीवरील 7 बलून बंधाऱ्यांना मंजूरी मिळाली आहे. मेगा रिचार्जसारखा प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर तापी नदीच्या पूर पाण्यातून पाडळसे धरण भरण्यात येऊन अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांसाठी कायमस्वरुपी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पाडळसे (निम्नतापी) धरणाकरीता नाबार्डकडून 1500 कोटी रुपयांसह राज्यातील इतर प्रकल्पांसाठी 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील भागपूर, बोदवड सिंचन, वरणगाव-तळवेल आदि योजनांचा समावेश आहे.
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्याबरोबरच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरीक बाधित झाले तसेच अनेकांच्या शेतीचेही नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून लवकरच शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात येत आहे. माझे सर्वांना नम्र आवाहन आहे, की प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पुरामुळे बाधित झालेल्यांना तसेच मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात देवू या !

राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीक केंद्रस्थानी ठेऊन विविध लोकोपयोगी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली. या योजनेचा जिल्ह्यातील 2 लाख 866 शेतकऱ्यांना 785 कोटी 44 लाख 5 हजार 486 रुपयांचा लाभ मिळाला. केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील 4 लाख 55 हजार 699 लाभार्थ्यांची माहिती NIC पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीचा खरीप हंगाम पुरेशा पावसाअभावी बाधित झाला होता. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील 5 लाख 31 हजार 150 बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत 369 कोटी 12 लाख रुपये इतक्या निधीचे वितरण केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2018 मधे 2 हजार 77 शेतकऱ्यांना 23 कोटी 72 लाख 45 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

गावातील पाणी गावातच अडविण्यासाठी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षात 660 गावांमध्ये घेण्यात आलेल्या 16 हजार 348 कामांवर 310 कोटी 49 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या कामांमुळे 78218.12 टीसीएम एवढा संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सन 2018-19 मध्येही जिल्ह्यातील 235 गावांची निवड करण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेचे जिल्ह्याला 2 हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यानुसार जिल्ह्यात 3 हजार 256 लाभार्थींना कार्यारंभ आदेश दिले असून त्यापैकी 2 हजार 164 कामे पूर्ण झाली आहेत. तर 38 कामे सुरु असून त्यासाठी 10 कोटी 6 लाख 96 हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध व्हावे याकरीता जळगाव पाटबंधारे प्रकल्पामधील 66 प्रकल्पांपैकी 34 प्रकल्प (2 मध्यम, 32 लघु) पूर्ण झाले असून उर्वरीत 32 प्रकल्प (7 मोठे, 6 मध्यम व 19 लघु) प्रगतीपथावर आहेत. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात निम्न तापी, वाघूर प्रकल्प, अंजनी मध्यम प्रकल्प व निंबादेवी, सुनसगांव, कुऱ्हा, जामठी व बोरखेडा सांगवी या लघुप्रकल्पांची मिळून एकत्रीत 17 हजार 737 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेळगांव बॅरेज व वरखेडे लोंढे बॅरेज या दोन प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील 19 हजार 237 हेक्टर क्षेत्र सिंचनखाली येणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी देता यावे याकरीता वीज महत्त्वाची आहे. त्यामुळे उच्च विद्युत वितरण प्रणालीद्वारे 487 कृषीपंपांना विद्युत पुरवठा करण्यात आलेला असून उर्वरीत 5 हजार 528 कृषीपंपांना जानेवारी 2020 पर्यंत विद्युत पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी 120 कोटी 58 लाख रुपयांचा निधी प्राप्त आहे. मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेतंर्गत 1 हजार 116 लाभार्थ्यांना सौर कृषी पंपांकरीता मंजूरी देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजनेत जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत 39 हजार 689 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी 34 हजार 115 घरकुलांचे काम पूर्ण झाले आह. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 31 हजार 446 दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर 6 हजार 628 लाभार्थ्यांना जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सौभाग्य योजने (प्रधानमंत्री हरघर सहज बिजली योजना) अंतर्गत 65 हजार 27 घरांना विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यासाठी 71 कोटी 5 लाख रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात रोजगार व स्वयंरोजगारास चालना मिळावी यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत गेल्या पाच वर्षात 6 लाख 52 हजार 223 खातेदाराना कर्जाचे वाटप करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत जिल्ह्यात पाच वर्षात 3 हजार 247.30 किमी लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व नुतनीकरण करण्यात आलेले आहे. या कामासाठी 1008.800 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री यावेळ म्हणाले.

रेल्वे सुरक्षातंर्गत जिल्ह्यात 9 रेल्वे उड्डाणपुलांची कामे मंजूर आहे. त्यापैकी 7 कामे प्रगतीपथावर असून 2 कामे निविदा स्तरावर आहे. जळगाव-भुसावळ तीसरी व चौथी रेल्वे लाईन व जळगाव- मनमाड तिसरी रेल्वे लाईनसाठी भूसंपादनाची व इतर कामे सुरु आहे. जिल्ह्यातील नागरीकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 9 लाख 13 हजार 634 लाभार्थी कुटूंबांतील 71 हजार 599 रुग्णांना 159 कोटी 99 लाख 27 हजार 390 इतका निधी मंजूर केलेला आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 3 लाख 69 हजार 809 तसेच शहरी भागातील 1 लाख 5 हजार 156 अश्या एकुण 4 लाख 74 हजार 965 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणेच शुद्ध हवेची प्रत्येकाला आवश्यकता असते. प्रत्येकाला शुद्ध हवा मिळून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरीता शासनाच्यावतीने 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यावर्षी आपल्या जळगाव जिल्ह्यात 1 कोटीपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेत नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन यावेळी पालकमंत्री ना. महाजन यांनी केले. जलशक्ती अभियानात जिल्ह्याचा समावेश झाल्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला जाणार असून यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारत एकसंघ राष्ट्र होणार असून तीन तलाक चा निर्णय महत्वपूर्ण असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवृत्त विभागीय आयुक्त रविंद्र जाधव यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री महाजन यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.उस्मानी व राजेश यावलकर यांनी केले.

या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय इमारतीमधील शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.