गिरीश महाजन मंत्री आहेत की पक्षाचे खजिनदार ? :जयंत पाटील

अडीच महिन्यानंतर धुळे शहरात नगरपालिका निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आताच तयारी करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केले. जळगाव महानगरपालिकेत भाजपने भरमसाठ पैसा वाटला. गिरीश महाजन मंत्री आहेत की पक्षाचे खजिनदार हेच कळत नव्हते. पण या सरकारने जनतेला खुळे समजू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिला आहे.

आ. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्याच्या उत्तर महाराष्ट्र टप्प्याची आज सुरुवात झाली. यावेळी त्यांनी धुळे जिल्ह्यातीस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे सांगत बुथ कमिट्यांवर आपल्याला भर द्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. बुथ सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅपचा उपयोग करावा, असा सल्ला दिला. बुथ कमिट्यांची रचना नीट केली तर आपल्याला कार्यकर्त्यांचा एक मोठा संच मिळेल. बुथ कमिट्यांमध्ये समाजातील घटकांचा समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले.

देशात वातावरण बदलू लागले आहे. २०१४ साली मोदींची वाह वाह करणारी जनता आज मोदींना नको नको म्हणत आहे. मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना आणली त्याची जागोजागी पेट्रोल पंपावर जाहिरातबाजी केली आहे. युपीए सरकारच्या काळात ३५० रुपयांना गॅस मिळत होता. पण आता ८५० च्या वर भाव गेला आहे. आपले सरकार आले तर तोच गॅस पुन्हा ४०० वर आणू हा प्रचार कार्यकर्त्यांनी करावा. शेवटी सरकार गरिबांसाठी असते. सरकारचा हा खोटारडेपणा बाहेर काढण्यासाठी पेट्रोल दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलन करा, असेही त्यांनी सांगितले.

खड्डेमुक्त महाराष्ट्र करू असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते मात्र आजही महाराष्ट्रात खड्डे दिसत आहेत. आज चंद्रकांत पाटील यांचे काळे झेंडे दाखवून रत्नागिरीत स्वागत झाले. खा. सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम राबवला आणि सरकारचा निषेध केला. सरकारच्या विविध चुकांचा आपण समाचार घ्यायला हवा, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत पत्रकारांनी माहिती दिली की देशातील प्रमुख बँकांच्या एनपीएत वाढ झाली आहे. बऱ्याच बँकांचे एनपीए ५० हजार, ६० हजारच्या वर गेला आहे त्यामुळे देशावर आर्थिक संकट आले आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. नोटाबंदीनंतर मशीन असताना नोटा मोजण्यासाठी सरकारला २२ महिने का लागले? १००% पेक्षा जास्त नोटा बाहेर आल्या असाव्यात पण हे सत्य बाहेर कसे सांगावे, सत्य लपवण्यासाठी आणि ९९.३० हा आकडा सांगण्यासाठी सरकारने २२ महिने घेतले असे म्हटले तर ते योग्य ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले.

बोफोर्स घोटाळ्याच्या नावावर राजीव गांधी यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता नरेंद्र मोदी यांच्या काळात राफेल घोटाळा झाला आहे. त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. सरकारने खासगी कंपन्यांना हे काम दिले आहे. निवडक उद्योगपत्यांसाठी हे केले गेले. नरेंद्र मोदी यांचा पारदर्शी मुखवटा आता गळून पडू लागला आहे, अशी टिपण्णी जयंत पाटील यांनी केली. देशाचे संविधान जाळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही पण आमच्या महिलांनी त्याविरोधात आंदोलन केले तर त्यांच्यावर केसस टाकल्या जात आहेत. अशा पद्धतीने दडपशाहीच्या वातावरणात सरकार चालत आहे, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. देशातील सर्व चौकटा मोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तेव्हा सर्व परिवर्तनवादी विचारांच्या लोकांनी एकत्र यावे यासाठी स्वतः खा. शरद पवार साहेब प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या सरकारला आता खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन त्यांनी केले.

या आढावा बैठकीस माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष किरण नाना शिंदे, शहराध्यक्ष मनोज मोरे, महापौर कल्पना महाले, ज्येष्ठ नेते एन.सी.पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, महिला शहराध्यक्ष राधिका ठाकूर, युवक अध्यक्ष रणजित भोसले, माजी महापौर मोहन नवले, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत केले उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी जनतेच्या सेवार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.