बारामती ही पवारांची जरी असली तरीही पक्षाने जबाबदारी दिल्यास बारामतीही जिंकू’

जळगाव : ‘ बारामती ही पवारांची जरी असली तरीही पक्षाने जबाबदारी दिल्यास बारामतीही जिंकू, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. गेल्या पाच-सहा वर्षात चांगले चांगले साफ झाले आहे, मायक्रो मॅनेजमेंट केलं तर काहीच कठीण नाही, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन?

बारामतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे आजपर्यंत कुणाला तिथे विजय मिळवणे शक्य झाले नाही, असा सवाल पत्रकाराने केला असता. यावर महाजन म्हणाले तसं बघायला गेलं तर जळगाव, नगर, धुळ्यात आमचंही वर्चस्व नव्हतं. गेल्या पाच सहा वर्षात चांगले चांगले वर्चस्व साफ झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आधी कुणाचं अस्तित्व होतं, पुण्यात कुणाचं वर्चस्व होतं. सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. परंतु, राष्ट्रवादीकडे एक सुद्धा महापालिका राहिली नाही.

बारामतीचे चॅलेंज नाही. पण, चांगलं मायक्रो मॅनेजमेंट केलं तर कुठल्याही शहरात जिंकणे अवघड नाही. बारामती ही पवारांची जरी असली, तरी तिथे नीट कार्यकर्त्यांची फळी लावली तर कठीण काहीच नाही. पक्षाने जर जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवू ,असा दावाही त्यांनी केला.