तुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मध्ये प्रचंड यादवी माजलेली दिसत आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाख्या नेत्यांवर पक्षात अन्याय झाल्याचं बोललं जात आहे. मात्र या सगळ्यात केवळ भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. खडसे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांनीच केल्याचा आरोप केला आहे. याला आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिल आहे.

“कुणीही कुणाला पाडत नसते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे यापूर्वी अवघ्या १२०० आणि ८५०० हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. मात्र, यावेळी त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे फरक पडला. तसेच याठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रही आले होते, त्यामुळे त्यांच्या मुलीचा पराभव झाला आहे.” अस गिरीश महाजन म्हणाले आहेत. तर एकनाथ खडसे यांनी पुराव्यानिशी पक्षातील त्या नेत्यांचे नावे जाहीर करावीत, असे थेट आव्हान देखील महाजन यांनी दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी पक्षनेतृत्वावर तोफ डागली होती. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातंर्गत विरोधकांमुळे झाला. या सगळ्यांची नावे मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहेत. आता या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मी ही गोष्ट स्वत: वरिष्ठांच्या कानावर घातली. मला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. गेल्या काही काळात जे काही घडले त्यामुळे पक्षातील अनेकजण अस्वस्थ आहेत. याबद्दल मी वरिष्ठांना कळवल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते.

तसेच पक्षनेतृत्त्वाने अपयशाची जबाबदारी घेतली पाहिजे. यश माझ्यामुळे आणि अपयश दुसऱ्यामुळे हे धोरण साफ चुकीचे आहे, असा टोलाही खडसेंनी लगावला होता. याशिवाय, भाजपमध्ये ओबीसींना डावलले जात असल्याची कबुलीही खडसे यांनी दिली होती. मात्र, महाजन यांनी हा आरोपही फेटाळून लावला. भाजपमधील सर्वात महत्त्वाची पदे ओबीसींकडे आहेत. मी स्वत: ओबीसी आहे. भाजपचे आमदार पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा कपोकल्पित असल्याचे महाजन यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या