कार्यकर्ता हीच माझी ताकद, दलित मेळाव्यात बापट यांचे प्रतिपादन

पुणे : “गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जातीपातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर पाच वेळा आमदार व तीन वेळा नगरसेवक झालो. कार्यकर्ता हीच माझी ओळख आणि ताकद आहे.” असे प्रतिपादन लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे केले.

गिरीश बापट यांच्या समर्थनार्थ ताडीवाला रोड येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात भारतीय दलित कोब्रा संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. भारतीय दलित कोब्रा संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अडव्होकेट भाई विवेक चव्हाण, नगरसेवक उमेश गायकवाड, दीपक पोटे, महेश लडकत, दीपक पोटे, श्रीपती सोनावणे, सुनील व्हगाडे, राहुल भोसले, राहुल बोराडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बापट म्हणाले की, पुढच्या पाच वर्षात आपला खासदार कोण असणार हे ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. दैनंदिन जीवनात आपण निरखून पारखून व्यवहार करत असतो. हीच पारख लोकप्रतिनिधी निवडतानाही आपण करायला हवी. आमच्या सरकारने गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या, दुसरीकडे विरोधकांनी मात्र आजपर्यंत लोकांना खोटी आश्वासने दिली. सर्वसामान्यांची कामे करताना आम्ही कधी त्याची जातपात पहिली नाही.पण विरोधक मात्र माझ्या जातीवरून राजकारण करत आहेत. गेली तीस वर्षे एक पैसा ही न वाटता जनतेच्या प्रेमावर मी निवडून येत आहे. निवडणूक आहे म्हणून खोटी आश्वासने मी देणार नाही. पण शेवटच्या श्वासापर्यंत गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढत राहीन हे वचन देतो, असे सांगत बेघरांना हक्काचे घर मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही बापट म्हणाले.