कालवाबाधित उर्वरित घरांचे पंचनामे करा- पालकमंत्री बापट

पुणे : मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्‍या व पंचनामे करावयाचे राहिलेल्‍या घरांचे पंचनामे करण्‍याचे आदेश अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ,महापौर मुक्‍ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्‍दार्थ धेंडे, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, महापालिकेचे आयुक्‍त सौरभ राव, अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उपजिल्‍हाधिकारी दत्‍तात्रय कवितके, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता एस.डी. चोपडे, मनपाचे मुख्‍य अभियंता विजय कुलकर्णी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, हेमंत निकम, अन्‍नधान्‍य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, तहसिलदार गीता दळवी, नगरसेवक धीरज घाटे, महेश लडकत,आनंद रिठे, संतोष कदम, शंकर पवार,रघु गौडा आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

कालवा फुटल्यानंतर जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने पंचनामे करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये 98 पूर्णत: बाधित तर 661 अंशत: बाधित घरांचे पंचनामे झाले होते. तथापि, काही घरांचे पंचनामे झाले नसल्याच्‍या तक्रारी आल्‍यानंतर पालकमंत्री बापट यांनी आठ अधिका-यांचे पथक स्‍थापन करुन तक्रार प्राप्‍त घरांचे पंचनामे करण्‍याचे आदेश दिले.

मुठा कालवाग्रस्‍तांना आवश्‍यक ती सर्व मदत करण्‍यात येईल, असे स्‍पष्‍ट करुन पालकमंत्री बापट यांनी बाधित नागरिकांसाठी जातप्रमाणपत्र, आधारकार्ड वगैरे बाबत शिबीर घेणे, अन्‍नधान्‍य पुरवठा करणे, गॅस उपलब्‍ध करणे, कालवादुरुस्‍ती, स्‍वच्‍छता आदींबाबतही सूचना दिल्‍या. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या सदनिकांची पहाणी करुन पात्र व्‍यक्‍तींना सदनिका देण्‍याबाबत कार्यवाही करण्‍याच्‍या त्‍यांनी सूचना केल्‍या.

गॅस सिलेंडर वाहून गेलेल्‍या नागरिकांना गॅस जोडणी उपलब्ध करुन देण्‍यासाठी आवश्‍यक ते प्रयत्‍न केले जातील, असेही त्‍यांनी सांगितले. कालवा फुटीची दुर्घटना ही नैसर्गिक आपत्‍तीच असून कालवाबाधितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे ते म्‍हणाले. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कालवा बाधितांची गहाळ झालेली प्रमाणपत्रे देण्‍याबाबत लवकरच समाधान शिबीर घेण्‍यात येईल, असे सांगितले.