गुरुवारचा पाणीपुरवठा बंद म्हणजे छुपी पाणी कपात याला बापटच जबाबदार

पुणे : महापालिकेमार्फत दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने छुपी पाणी कपातच लादली असून पालकमंत्री गिरीश बापट यांचा नियोजनशून्य कारभार याला जबाबदार आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवला जात आहे आणि त्याचा परिणाम शुक्रवारी सुध्दा जाणवतो. पुणेकरांना सलग दोन दिवस पाणी मिळू शकत नाही. या धोरणाने महिन्यातील आठ दिवस पाणी मिळत नाही. सत्ताधारी भाजपचा पाणीकपात करण्याचा डाव दिवाळीच्या सणापासून चालू आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा खात्यामार्फत पाणीकपात करण्याचे प्रकार हेतुतः झाले.ते प्रकार झाल्यावर आता महापालिकेमार्फत दर गुरुवारी पाणी बंद ठेवले जात आहे. देखभाल , दुरुस्तीच्या कामाची सबब सांगून पाणी बंद ठेवले जात आहे . दर आठवड्याला दुरुस्तीची कोणती कामे होतात ?याचा तपशील तरी महापौर आणि सभागृह नेत्यांनी जाहीर करायला हवा , अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

यंदा धरणक्षेत्रात पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाला. पुण्याला पाणी पुरविणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाणीसाठाही २६ टीएमसीहून अधिक झाला .परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांच्या हक्काचे पाणी जादा प्रमाणात सोडून दिले. पाणीसाठा उपलब्ध असताना कालवा पाणीवाटप समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे आज पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे .आगामी निवडणुकीत सर्व पुणेकर महिला भाजपला जाब विचारतील असे जोशी यांनी म्हटले आहे.

पुण्याला त्याच्या वाट्याचे न्याय्य पाणी मिळाले पाहिजे अशी रास्त मागणी आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीचे गांभीर्य आम्हालाही आहे. त्यामुळे अवाजवी पाणी पुरवा , अन्य क्षेत्रावर अन्याय व्हावा अशी भूमिका नाही , असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.