Gionee S10- चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस १०

स्मार्टफोन ड्युअल कॅमेर्‍यांसह येत आहेत. यातील काही मॉडेल्समध्ये मुख्य तर काहींमध्ये फ्रंट बाजूला दोन कॅमेरे दिलेले असतात. जिओनी कंपनीने मात्र आपल्या एस १० या मॉडेलमध्ये मागील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्सचे तर समोरच्या बाजूला २० व ८ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे दिले आहेत. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाची छायाचित्रे काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता जिओनी एस १० या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. मीडियाटेक हेलिओ पी२५ या प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडपासूनन विकसित करण्यात आलेल्या अमिगो ओएस ४.० या प्रणालीवर चालणारे आहे. हे मॉडेल प्रारंभी चीनमधील ग्राहकांना मिळणार असून ते येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठेत मिळू शकते.

दरम्यान, जिओनी कंपनीने या मॉडेलसोबतच एस१० बी आणि एस१० सी हे दोन मॉडेल्सदेखील लाँच केले आहेत. यातील एस१० बी या मॉडेलमध्ये मागील बाजूस १३ व ५ तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे असे एकंदरीत तीन कॅमेरे असतील. यात ५.५ इंच आकाराचा फुल एचडी डिस्प्ले, रॅम चार जीबी तर स्टोअरेज ६४ जीबी तर ३७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर जिओनी एस१० सी या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकाराचा एचडी डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी व स्टोअरेज ३२ जीबी असेल. यात १६ व १३ मेगापिक्सल्सचे रिअर आणि फ्रंट कॅमेरे तर ३१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल.