fbpx

एका फलकामुळे फुटले भाजपचे बिंग, आयपीएल बुकी प्रकरणातील आरोपी निघाला भाजप नेता ?

टीम महाराष्ट्र देशा- आयपीएल बुकी प्रकरणात चोपड्याचे भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांना रायगडातील खालापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अग्रवाल यांचा भाजपाशी संबंध नसल्याचा दावा भाजपाचे जळगाव शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला होता मात्र एका फलकाने भाजपचे बिंग फुटले आहे.

जळगाव शहरात नुकत्याच झालेल्या अपंग शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर फलक लावण्यात आले होते, त्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. त्यावर अग्रवाल यांचेही छायाचित्र असून नेते म्हणून त्यावर उल्लेख केलेला आहे.

काय आहे प्रकरण ?
रायगड गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकत चौक गावातील लिलाई हॉटेलमधून विक्रम वारसमल जैन (39, निगडी, पुणे), नरेश रामस्वरूप अग्रवाल (47, सामाटणे, तळेगाव), नवीन बाळकृष्ण अग्रवाल (41, देहु रोड, पुणे), दीपक दौलतराम कृपलानी (43, जाधववाडी, पुणे), नदीम मैमुद्दीन पठाण (28, आकुर्डी, पुणे) व लॉजमालक रवींद्र राजाराम डोंगरे अटक केली होती. आरोपींच्या ताब्यातून 98 हजारांची रोकडसह कार, मोबाईल, कॅलक्यूलेटर, सेट टॉप बॉक्स, पोर्टेबल टीव्ही, फोन आदी साहित्य मिळून 12 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. बुधवारी रात्री दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान रात्री उशिरा कारवाई झाली होती. अटकेतील आरोपींना न्यायालयाने 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, अटकेतील बुकींनी पुण्यातील बुकी विजय अग्रवालचे नाव सांगितल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व या आरोपीने चोपड्यातील घनश्याम अग्रवाल या बड्या बुकीचे नाव सांगितल्याने त्यांना शनिवारी अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.मात्र अग्रवाल यांचा भाजपाशी संबंध नसल्याचा दावा भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून केला होतापाटील यांनी रविवारी तातडीने पत्रकार परिषद घेतली होती. घनश्याम अग्रवाल भाजपाचा कोणताही सदस्य नाही व पदाधिकारीदेखील नाही. त्यांची ११ वर्षांपूर्वी भाजपमधून हकालपट्टी झाल्याचा दावा त्यांनी केला होता.