माऊली आणि तुकोबांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा – अजित पवार

ajit pawar and sambhaji bhide

नागपूर  – संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे असून महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेणार नाही. यामागचा मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजितदादांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहात केली.

माऊली आणि तुकोबाचे विचार सर्व जगाला माहिती आहे. आपण त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो. पण कोण तरी संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे योग्य नाही.

५७ टक्के लोकांना शुद्र मानणारा मनू श्रेष्ठ कसा ? हे आपल्या राज्यात चालणार नाही. यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. मागच्या वर्षी हे पालखीमध्ये तलवारी घेवून आले होते. यांचा पाठीराखा कोण आहे असा सवालही दादांनी केला.

त्या व्यक्तीला काय बोलावं कसं बोलावं. एकीकडे सांगितले आंबे खावा म्हणजे मुलं होतील…त्यांनी पिकवलेले आंबे… आणि काल तर कहरच केला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरमाऊली महाराज यांच्यापेक्षा मनु हा श्रेष्ठ होता या पध्दतीचं वक्तव्य…म्हणजे मनुने काय सांगितले होते.मनुने सर्वांना अतिशय तुच्छ लेखलं होतं.समाजातील दोन-तीन टक्केच लोक चांगली आहेत असे विचार मनुने सांगितले.तो विचार योग्य नाही हे सांगण्याचे काम महात्मा फुलेंनी केलं. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आणि ती मनुस्मृती फाडून जाळून टाकली.त्या मनुला हे गोंजारत आहेत हे कसले विचार आणले जात आहेत असा सवालही दादांनी केला.