स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचा आदेश

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणून आत्ताच निवडून आलेले शिवसेनेचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार दराडे व बाजोरिया यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे व जास्तीत जास्त जबाबदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. दराडे यांना पुढील महिन्यात होणाऱ्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्यास सांगितले असून उमेदवारी संदर्भात चर्चा पण झाली आहे. नवनिर्वाचित आमदार दराडे व बाजोरिया यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दणदणीत पराभव करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचीत विधानपरिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांचे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष कौतुक करीत त्यांच्या जिल्ह्यातील पुढील निवडणुकांसाठी रणनीती तयार करून सर्व ताकदीनिशी उतरण्याचे आदेश दिले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बाजोरिया पिता-पुत्रावरील जबाबदारी आता वाढली असून, अकोला, वाशिम, बुलडाण्यासह परभणी-हिंगोली मतदारसंघात पक्षसंघटन अधिक मजबुत करून विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, अशी सुचना उद्धव ठाकरे यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया व विप्लव बाजोरिया यांना केली.

पुढील वर्षातील सर्व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष बनण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपापल्या भागात सर्वच कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी जोमाने कामाला लागणे गरजेचे असून आता भगवा फडकवल्याशिवाय शांत बसायचे नाही असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

You might also like
Comments
Loading...