संप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप तासाभरात मागे घ्यावा आणि संप मागे घेतल्याची घोषणा करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई देखील करण्यात येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचारी संघटना लवकरच संप मागे घेणार असे स्पष्ट झाले आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. लाखो मुंबईकरांना या संपाचा फटका बसत असल्याने संप त्वरीत मागे घेण्यात यावा अशी मागणी करीत अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने संप तासाभरात मागे घ्यावा आणि संप मागे घेतल्याची घोषणा करा असा आदेश दिला. त्या सोबतच वेतनश्रेणीतील जो फरक होता तो सोडवला जाणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांत चर्चाकरून प्रश्न सोडवण्यास सांगण्यात आले आहे.