जेऊर : स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, सर्वसामान्य नागरिक हैराण

state bank of india

करमाळा– भारतीय स्टेट बँक ही सर्वात विश्वसनीय बँक म्हणून ओळखली जाते. सर्व शासकीय सेवांसाठी तसेच विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम एसबीआय मध्ये खाते उघडणे आवश्यक असते मात्र सध्या करमाळा तालुक्यातील जेऊर स्टेट बँकेत मनमानी कारभार चालत असून विद्यार्थी, जेष्ठ नागरिक तसेच महिलांना मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा अनुभव येत असल्याने सर्वजण हैराण झाले आहेत.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विविध जेष्ठ नागरिकांना वयोवृद्ध अनुदान कामी तसेच इतर नागरिकांना विविध योजनांसाठी बँकेत खाते आवश्यक आहे. परंतु स्टेट बँकेच्या जेऊर शाखेमध्ये विद्यार्थी व नागरिकांना खाते उघडण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्ज मिळणे कामी विविध योजना ह्या शासनाकडून प्रसिध्द होत असतात परंतु जेऊर परिसरातील व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी जावे लागते. तसेच जेऊर परिसरातील व्यापाऱ्यांना दररोज आपल्या बँकेमार्फत डी.डी तसेच एनईएफटी, आरटीजीएस, करावे लागतात परंतु कर्मचारी अभाव असल्याचे कारण देत टाळाटाळ केली जाते. हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नुकसान दायक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शाखे शेजारी असणारे एटीएम् मशीन हे निव्वळ शो पीस असल्याचे दिसून येते.सतत एटीएम बंद स्थितीत असते त्यामध्ये मुबलक कॕश उपलब्ध नसते. तसेच सीडीएम मशीन सतत काही कारणांमुळे बंद अवस्थेत असते. सध्या नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे..

वरील सर्व समस्यांवर बँकेने,वरीष्ठ अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालणे गरजेजे आहे व वरील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात अन्यथा जेऊर व्यापारी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच होणाऱ्या नुकसानास स्टेट बँक जबाबदार राहिल असा इशारा जेऊर येथील व्यापारी संघटनेने दिला आहे.