गौरी लंकेशची हत्या आणि उजवे 

gauri lankesh हत्या

 जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी  हत्या करण्यात आली. त्यांची हत्या झाल्यानंतर  देशभरातून त्यांच्या मारेकऱ्यांचा निषेध सुरू झाला. उजव्या विचारसरणीच्या त्या कट्टर विरोधक होत्या या न्यायाने त्यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली असावी अशी सुई अप्रत्यक्षपणे टाकून न्यूज चॅनल मोकळे झाले. अनेकांनी तर दाभोळकर पानसरे यांच्याच मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केल्याची शंका  व्यक्तही  केली.  कोणत्याही व्यक्तीची हत्या करणं हे चूकच.  त्यामुळे लंकेश यांच्या मारेकऱ्याना शिक्षा हि निश्चितच  मिळालीच पाहिजे. पण लंकेश यांच्या हत्येमागे उजव्या संघटना असतील याची शक्यता कमी वाटते मात्र जर असेलच तर उजव्यांइतके महामुर्ख कोणीच नसतील. दाभोळकर पानसरे यांच्या हत्येनंतर कुठल्याही पुरोगामी विचारवंताच्या हत्येचं पातक आपल्या माथी येणार हे न कळण्याइतके उजवे दुधखुळे नाहीत. त्यातच सध्या शेतकरी आंदोलनाने देश पेटलाय. नोटाबंदीच्या न झालेल्या परिणामांवर  शहरी मध्यमवर्ग प्रश्न विचारतोय. सुप्रीम कोर्ट गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या हत्यांवरून सरकारला झापतो आहे.तर महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या ,गुजराथहिमाचलमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशावेळी  एका पुरोगामी  लेखिकेला  पत्रकाराला मारुन  धावतं घोडं अंगवार घ्यायची हिंमत संघ ,
संघ परिवार आणि तथाकथित हिंदुत्ववादी संघटना करण्याची शक्यता कमीच वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे या आधी जे विचारवंत मारले गेले त्यांना कुणी मारले हे समोर आलेच नाही.
पण त्यांच्या हत्येमुळे तोटा मात्र या हिंदुत्ववाद्यांचाच झाला. दाभोळकरांना मारल्यानंतर ज्यासाठी ते आयुष्यभर झटत होते  आणि ज्याचा विरोध काही हिंदुत्ववादी नेते करत होते तो अंधश्रधा विरोधी कायदा लगेच पास झाला आणि लागू ही झाला. ज्या शनिशिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून  २० वर्षांपुर्वी दाभोळकर लढत होते त्या मंदिरात दोन वर्षात महिलांना प्रवेश ही मिळाला.  दाभोळकर पानसरे यांच्या मृत्यू आधी हे दोन्ही विचारवंत महाराष्ट्रापुरतेच मोठे होते. त्यांच कार्य जरी जगाला मार्गदर्शन करणारं असलं तरी ते महाराष्ट्रापुरतचं मर्यादित होतं. आता मात्र ते  भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचले आहेत.  अनेकांसाठी मसीहा झाले आहेत. त्यांचे विचार मेले नाहीच उलट त्यांची काही ध्येयही पूर्ण झाली कलगबुर्गींच्या हत्येनंतर काही महिन्यातच डाव्या आणि समाजवादी विचारवंतांनी केलेल्या पुरस्कार वापसीचा बिहारच्या निवडणुकांमध्ये उजव्यांना चांगलाच  फटका बसला. त्यामुळे संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यात सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पाहणारे उजवे असं काही करतील असं वाटत नाही. त्यात पुढच्या वर्षी कर्नाटकात निवडणूका आहेत. मग जनता आपल्या विरोधात जावी असं कुणाला वाटेल. अशावेळी पुरोगामी नेत्यांची हत्या करून नुकसान त्यामुळे जास्त होईल.या गोष्टीचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदुत्ववाद्यांची नीती.

gauri collage

संघ आणि संघ परिवारातील मंडळी असतील किंवा भाजपमधील मंडळी  त्यांच्या विरोधी विचारांना
अनुल्लेखानेच मारतात असं  गेल्या काही वर्षात दिसतंय. २०१४ च्या निवडणूकीत  किती भाषणात
पुरोगाम्यांवर टीका केली होती?  संघाच्या मुशीत दिलेली भाषणं असतील. कुठे कुठे आणि कितीदा पुरोगाम्यांचा उल्लेख येतो. संघाच्या किती कार्यकर्त्यांनी खरंच मार्क्स सारखे पुरोगामी विचारवंत  वाचले असतील? किती कार्यकर्त्यांनी  खरोखर मार्क्सवर चर्चा केली असेल? संघातले किती नेते मार्क्सवर ताशेरे ओढतात?  याउलट संघसंघाची विचारधारा  विनाशकारी हिंदुत्व यावर पुरोगाम्यांचे तरूण कार्यकर्ते तासनतास भाषण देतील. त्यांचा विरोध करूनच आज पुरोगामी ख्याती मिळवत आहेत. पण उजवे मात्र असली टीका करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण ते पुरोगाम्यांना महत्त्वच देत नाही. आपल्या शत्रूला संपवायच असेल तर त्याला अनुल्लेखाने मारा. तो  आहे असं जाणवू देऊच नका. त्याच्यामुळे काही फरक पडेल याची तमा बाळगू नका. फक्त राष्ट्रनिर्मितीसाठी झटत रहा हे साधं सूत्र ते स्वीकारतात. त्यामुळे संघाच्या शाखा गावोगावी पोचतात. पुरोगाम्यांनाच काय पण सगळ्या जगाला हादरवून सोडेल असं नेटवर्क त्यांनी तयार केलंय. याऊलट पुरोगाम्यांची संख्या देशात घटतच चालली आहे. ज्या डाव्या विचारांचं समर्थन गौरी लंकेश करत होत्या त्या डाव्या विचारांच्या पक्षांना आज देशात लोकसभेत ३० जागा मिळवता येत नाही. गंमत म्हणजे त्रिपूराच्या पुरोगामी विचारांच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण आकाशवाणीवर  हे भाजप सरकार प्रसारित होऊ देत नाही. ते शेवटच्या माणसापर्यंत पोचत नाही. त्याबद्दल भाजप संघावर होणाऱ्या टीकेला ते उत्तर ही देत नाहीत.अशी नीती वापरताना मध्येच  कुणाचा तरी खून करून सारा बना बनाया डाव  ते का बिघडवतील?  याची चिन्हं कमीच दिसतात.

गौरी-लंकेश-अंतिम-संस्कार

या हत्येवरून सरकारला घेरण्याचा आणि अधिवेशन बंद पाडण्याचा प्रयत्न कॉंग्रेसपासून सगळेच
विरोधी पक्षनेते करतील.  देशभरात मोर्चेही निघत आहेत या सगळ्यात खूनी भलतंच कुणी निघालं आणि हत्येतं कारण दुसरंच काही मिळालं तर मात्र या सगळ्या पुरोगाम्यांची पंचयित होईल. त्यातच या हत्येचा आधीच्या तीन हत्यांशी संबंध नाही असं स्वत: कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणत आहेत . त्यामुळे  पुरोगामी विचारांचा माणूस मेला म्हणजे त्याला हिंदुत्ववाद्यांनीच मारला बाकी दुसरं कोणी मारूच शकत नाही ही विचारसरणी यापुढे तरी पुरोगाम्यांना टाळावी लागेल. पण या प्रकरणात दोषी कोणीही ठरो सगळ्यात मोठी चूक मीडियाचीच आहे. कारण कुठलाही तपास सुरू होण्याआधी कळत नकळत त्यांची हत्या हिंदुत्ववाद्यांनीच  केली असं मांडून मीडिया मोकळी झाली आहे. त्यामुळे निरपेक्षतेच तत्व मीडियाने धुळीस मिळवलं आहे. पण एक मात्र नक्की जर कर्नाटकात होणाऱ्या हत्येला हिंदुत्ववादी जबाबदार आहे असं मीडिया दाखवत असेल भले अप्रत्यक्षपणे , प्रत्यक्ष आरोप न करता  ..तर केरळामध्ये संघाच्या स्वयंसेवकांना कोणी मारलं हेही मीडियाने कोण मारतंय हेही  तेवढ्या ताकदीने करावं .

-एक विचारी तरुण 

( महाराष्ट्र देशा लेखकाच्या मताशी सहमत असेलच असे नाही )