उजनी परिसरातील उद्यान वर्षानुवर्ष मंजुरीनंतरही रखडले

ujani dam

सोलापूर : उजनी धरण पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धरणक्षेत्रात पर्यटन केंद्र विकसित होऊ शकलेले नाही. २८ सप्टेंबर २०११ रोजी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने धरणाच्या बाजूस नदीच्या उजव्या तीरावर विनावापर असलेल्या ४३.२६ हेक्टर जमिनीवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या धर्तीवर पर्यटन केंद्र विकसित करण्यास मान्यता दिली होती. परंतु, गेल्या सहा वर्षात राज्य पर्यटन महामंडळ, उजनी धरण व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या उदासीनतेमुळे पर्यटन केंद्राचा आराखडाच तयार झाला नाही. आता पुढील आठवड्यात पर्यटन महामंडळाकडील पथक पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता साेनीवाल यांनी दिली.

आलमट्टी, पैठणच्या धर्तीवर उजनी धरण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर विकसित करण्यास २०११ मध्ये महामंडळाने ठराव करून मंजुरी दिली. गेल्या सहा वर्षात पर्यटन महामंडळ, उजनी धरण व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या कालावधीत पर्यटन केंद्राचा आराखडा तयार करण्याबाबत एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मात्र त्यानंतरही पुढे काहीच झाले नाही.

इंदापूर तालुक्यात पर्यटन केंद्र…
कृष्णा-खोरे विकास महामंडळाने २०११ साली उजनी धरण परिसरातील विनावापर असलेल्या ४३ हेक्टर जागेवर पर्यटन केंद्र उभारण्यास मंजुरी दिली. मात्र हे ठिकाणी इंदापूर जि. पुणे येथील हिंगणगाव, तरटगाव कांदलगाव या तीन गावच्या सीमेवर येते. ही जागा पर्यटन महामंडळाच्या पथकांनी पाहणी केल्यानंतर याठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करायचे की नाही ? हे ठरविण्यात येणार आहे. जागा निश्चितसाठी पर्यटन विभागास धरण व्यवस्थापन विभागाने पत्रव्यवहार केला आहे, त्यानुसार आठवडाभरात हे पथक पाहणीसाठी येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सोनीवाल यांनी स्पष्ट केले.

1 Comment

Click here to post a comment