कचरा प्रश्न औरंगाबाद: अधिकारी करत आहेत दिरंगाई

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने नारेगाव कचरा डेपो येथे पुढील तीन महिने कचरा टाकण्यास मुभा देत विभागीय आयुक्त यांच्या कमिटीने यावर निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले होते. डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी  सर्व पर्यायांवर विचार करून चिकलठाणा येथील ३५ एकर जागा निवडली. कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी दुग्धनगरीची जागा निश्चिती झाल्यावर महापालिकेचे अधिकारी त्यादृष्टीने कामाला लागतील असे गृहीत धरण्यात आले परंतु महापालिकेचे अधिकारी हा निर्णय गांभीर्याने न घेता मोजमाप घ्यावे लागेल, फाइल करावी लागेल, इस्टीमेट तयार करू, अशी उत्तरे देत उडवाउडवी करत आहेत. त्यामुळे औरंगाबाद वासीयांना खरे काम कधी सुरू होईल याची वाट पहावी लागत आहे.