कचरा डेपोला विरोध केल्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग

औरंगाबाद  : बाभूळगाव आणि नारेगाव येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोला विरोध केल्यामुळे शहरात मोट्या प्रमाणावर कच-याचा ढीग जमा झाला आहे. गेल्या ५ दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा उचलण्यात आलेला नाही. पाच दिवसानंतर आज औरंगाबाद शहरात जवळपास २ हजार टन कचरा साचला आहे. अजूनही या कचरा कोंडीवर कुठलाच पर्याय निघालेला नाही. औरंगाबाद महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून नारेगाव कचरा डेपोत कचरा टाकत होती.

मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर नारेगाव कचरा डेपो बंद करण्यात आला. त्याला पर्याय म्हणून महापालिकेने बाभूळगाव शिवारातील एक कंपनीच्या आवारात कचरा टाकायला सुरुवात केली होती. या प्रकाराला येथील गावक-यांनी विरोध सुरू केला आणि कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या परत पाठवून दिल्या.

याकारणास्तव कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे पर्यायी जागाच नसल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.