गणपतराव आबांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, समर्थकांना अश्रू अनावर

गणपतराव देशमुख

सांगोला – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार, गणपतराव देशमुख यांचं काल रात्री सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झालं. ते 94 वर्षाचे होते. सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी 54 वर्षं सांगोल्याचं प्रतिनिधित्व केलं होते.

आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी आणि जन-सामान्यां प्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपणाऱ्या देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज सोलापुरातील सांगोल्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या पेनूर या जन्मगावी ठेवण्यात आलं. यावेळी देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थ आणि समर्थकांनी गर्दी केली.

सांगोल्यात देशमुख यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर हजारो कार्यकर्ते जोडले. त्यांच्या राजकारणातल्या यशस्वी कारकीर्दीचं तेच गमक होतं. अत्यंत साध्या राहणीमुळं सर्वसामान्य माणसांना ते नेहमीच आपले वाटत.

गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून त्यांनी तब्बल अकरावेळा विक्रमी विजय मिळवला. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. गणपतराव देशमुखांच्या निधनानं त्यांची कर्मभूमी सांगोलावर शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

महत्त्वाच्या बातम्या