डीजेच्या वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक

crime-1

जळगाव : लग्नसोहळ्यात डीजेसाठी वापरणाऱ्या वाहनातून चक्क गांजाची तस्करी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडे सहा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला असून सुनील माधवराव मोहिते याच्यावर भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कनाशी (ता.भडगाव) येथे राहणारा सुनील माधवराव मोहिते हा २४ वर्षीय युवक डीजेचा व्यवसाय करतो. डीजेच्या वाहनातूनच तो गांजाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा-कजगाव दरम्यान त्याचे वाहन अडवून पोलिसांनी कारवाई केली. पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील यांनी वेशांतर करून वाहनाची तपासणी करण्यापूर्वी स्वत:च बनावट ग्राहक असल्याचे भासवले. काही वेळ बोलणे झाल्यानंतर कुराडे यांनी त्याच्या हालचाली टिपल्या. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, मनोहर देशमुख, रवींद्र गायकवाड, दिलीप येवले, सतीश हळनोर, विनोद पाटील, रवींद्र घुगे आदींच्या पथकाने वाहनाजवळ येऊन तपासणीला सुरूवात केली. डीजेच्या सामानात चार पोती गांजा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजासह डीजेचे वाहन जप्त केले आहे.