गणेशोत्सव भोवणार; कोरोना रुग्णवाढीत तब्बल २० टक्क्यांची वाढ

ganesh

मुंबई : राज्यात कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेला कोरोनाचे नियम पाळा असे वारंवार आवाहन करत आहेत. गर्दी होऊ नये यासाठी गणेशोत्सवासह इतर सणवारांवर अनेक निर्बंध लादण्यात आले असून राज्यातील मंदिरे देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवावर सध्या राज्य सरकारने निर्बंध जरी लागू केले असले तरी अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच कि काय आता महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी दैनंदिन कोरोना रुग्णवाढीत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना चाचण्यांचही प्रमाण वाढत असलं तरी वाढती आकडेवारी राज्यासाठी चिंतादायक ठरू शकते. राज्यात मंगळवारी ३,५३० नवे रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी हाच आकडा २,७४० इतका होता. मुंबईतील आकडा देखील ३४५ वरुन ३६७ इतका नोंदविण्यात आला. याशिवाय मृत्यूंचा आकडा देखील एका दिवसात २७ वरुन ५२ इतका झाला आहे.

त्यामुळे आता यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास आपण सर्वजण मिळून पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करू, त्यामुळे ‘महाराष्ट्र देशा’ तुम्हाला एवढेच आवाहन करत आहे कि, यंदाच्या गणेशोत्सवात शासनाने लागू केले सर्व नियम पाळा आणि कोरोनाचा धोका टाळा.

महत्त्वाच्या बातम्या