भाजपच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईकांचा युतीच्या नेत्यांना दणका

टीम महाराष्ट्र देशा: भाजपच्या वाटेवर असणारे नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते गणेश नाईक यांनी युतीच्या स्थानिक नेत्यांना दणका दिला आहे. नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणुकीत नाईक यांच्या गटाने युतीच्या पॅनेलचा पराभव केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवी मुंबईच्या राजकारणात नाईक घराण्याचा मोठा दबदबा आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देतानाच शिवसेनेला शह देण्यासाठी गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जातो. पुत्र आ. संदीप नाईक यांनी दोन आठवड्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला तर पाठोपाठ गणेश नाईक देखील लवकरच राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, एका बाजूला नाईक यांना शिवसेनेचा कडवा विरोध आहे. यामध्येच आता स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणुकीत नाईक यांनी दणका दिल्याने स्थानिक नेत्यांशी त्यांची दिलजमाई होणार का ? हा प्रश्न आहे.