कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी घातक

eco-friendly-ganesha

सोलापूर: कागदीलगद्यापासून निर्मित गणेशमूर्ती इको फ्रेंडली म्हणून विकल्या जातात. यावर आक्षेप घेत हिंदू जनजागृती समितीने पर्यावरणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून ‘राष्ट्रीय हरित लवादा’कडे याचिका दाखल केली होती. यावर ‘कागदी लगद्याच्या मूर्ती या पर्यावरणाला घातक आहेत’, असा निकाल न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांनी दिला आहे. शिवाय ३० सप्टेंबर २०१६ रोजी कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या शासन निर्णयावर स्थगिती आणली आहे, अशी माहिती हिंदू जगजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. दहा किलोंच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तीमुळे एक हजार लिटर पाणी प्रदूषित होते, तसेच शासन कोणतेही संशोधन करताच कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देत आहे, असेही हरित लवादाने मान्य केले आहे. त्यामुळे प्रदूषणकारी कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक आहे, असे म्हणणे म्हणजे जनतेची फसवणूकच आहे. इतकेच नव्हे तर शासनाने या कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींवर त्वरित बंदी घातल्यास त्यांच्या विरोधात हरित लवादाच्या आदेशाचे अवमान केल्याविषयी याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. शाडू मातीची गणेशमूर्ती जलप्रदूषण रोखणारी आणि अध्यात्म शास्त्रानुसार असते. शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती बनवण्यास मूर्तिकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.