खिलारवाडी तरुण मंडळाचा अभिनव उपक्रम

पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खिलारेवाडी तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, या निमित्ताने मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदानाचे महत्व जाणून हा उपक्रम या गणेश मंडळाने आयोजित केला होता. या शिबिरास कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांस आकर्षक भेट वस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय मारणे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिराचे संयोजन हनुमंत पवार यांनी केले. पी.एस.आय ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.

दरवर्षी मंडळाच्या वतीने अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये महिलांचे अथर्वशिर्ष पठण, भारुड, दिव्यांग महिलांचे आरोग्यविषयक व्याख्यान, भजन, छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यान, कीर्तन, होम मिनिस्टर, अंध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा असे विविध समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.