अशी झाली पुण्यातील मानाच्या पाच बाप्पांची प्रतिष्ठापना

कसबा गणपती ,सार्वजनिक गणेशोत्सव,, टिळक,pune ganesh festival ,manacha pahila ganpati जिजाबाई ,

पावसाच्या हलक्या सरी, ढोल-ताशा पथकांसह गणेशभक्तांचा उत्साह, गणपती बाप्पा मोरया..चा जयघोष,अशा चैतन्यपूर्ण तसेच भक्तीमय वातावरणात पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त दुपारपर्यंतचा असल्याने सकाळपासूनच गणेश मंडळांची लगबग सुरु होती

१ )कसबा गणपती

ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना सांगली येथील संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते झाली. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, आदिमाया ढोल-ताशापथक, नवीन मराठी शाळेचे लेझीमपथक आणि प्रभात बॅण्डपथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते.मंडळाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने 125 सुवासिनींनी गणपतीचे औक्षण केले. त्यापूर्वी सकाळी सव्वादहा वाजता उत्सव मंडपापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला.

२)तांबडी जोगेश्वरी

मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षी व्यापारी समीर शहा यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.शनिवार पेठ येथील गोखले मूर्तीकार यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतल्यानंतर ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची आढाव बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, शिवमुद्रा आणि ताल या ढोल-ताशा पथकांसह न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. पारंपरिक चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आली.

३)गुरुजी तालीम

उद्योजक सुकन शहा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.फुलांच्या रथातून श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक गणपती चौकापासून सकाळी दहा वाजता सुरू होऊन लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये पोचली. महिलांचा सहभाग असलेले नादब्रह्म हे पथक मिरवणुकीच्या अग्रभागी गर्जना, शिवगर्जना आणि गुरुजी प्रतिष्ठान या ढोल-ताशापथकांचा समावेश होता.

4)तुळशीबाग

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव या मानाच्या चौथ्या गणपतीची प्रतिष्ठापना मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते त्यापूर्वी सकाळी दहा वाजता उत्सव मंडपापासून सुरू करण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा होता तर नूमवि, नादब्रह्म, श्री महादुर्गा आणि उगम या ढोल-ताशापथकांचा सहभाग होता.

५)केसरीवाडा

डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना झाली.केळकर रस्त्यावरील मूर्तीकार गोखले यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतल्यानंतर श्री केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. बिडवे बंधू यांचे सनई-चौघडावादन मिरणुकीच्या अग्रभागी होती. श्रीराम ढोल-ताशापथक मिरवणुकीमध्ये सहभागी होते.