मानाच्या गणपतींची मिरवणूक वेळेत संपविण्यास पुढाकार

पुणे : मानाच्या पाचही गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक सुंदर आणि वेळेत पार पडावी, याकरीता आम्ही नियोजन केले आहे. रविवारी (दि.२३) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री, महापौर, आयुक्त आदी मान्यवरांच्या हस्ते गणरायाचे पूजन झाल्यानंतर प्रत्येक मानाच्या मंडळाचा गणपती १५ मिनीटाच्या अंतराने पुढे मार्गस्थ व्हावा, असा प्रयत्न यंदा राहणार आहे. त्याकरीता बेलबाग चौकापासून मुख्य ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील, असे नियोजन केले असून गणेशोत्सवाचा सर्वोच्च क्षण आणि मानबिंदू असलेला विसर्जन सोहळा वेळेत पार पाडण्याकरीता प्रशासन व पोलिसांनीही सहकार्य करावे, असे मानाच्या पाच मंडळांच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या उत्सवमंडपात आयोजित पत्रकार परिषदेला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, सौरभ धडफळे, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, नितीन पंडित यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीकांत शेटे म्हणाले, मंडई टिळक पुतळ्यापासून ते बेलबाग चौकापर्यंत मानाच्या गणपती मंडळांना येण्याकरीता जो वेळ लागतो, तो यंदा कमी करण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरीता ढोल-ताशा पथके लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या बाजूला सज्ज राहणार असून तेथून बेलबाग चौकातच ती पथके मिरवणुकीत सहभागी होतील. यामुळे मंडई ते बेलबाग चौक दरम्यान लागणारा जादा वेळ कमी होणार आहे. एका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि ३० जादा वादक असा ताफा असणार आहे. वादकांची संख्या मर्यादित करण्यात आल्याने वेळेतमध्ये फरक पडेल.

सौरभ धडफळे म्हणाले, मानाच्या गणपतींचे विसर्जन हौदात करण्याचा पायंडा पाडला होता. यंदा देखील तो पायंडा कायम ठेवणार असून मानाच्या गणपतीचे विसर्जन हौदात होणार आहे. नागरिकांनी देखील याचे अनुकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पृथ्वीराज परदेशी म्हणाले, ढोल-ताशा पथके हा मंडळांचा एक भाग आहेत. ढोल-ताशा पथके पुढे लवकरात लवकर जातील, असा प्रयत्न आहे. मात्र, पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करुन नये, असेही ते म्हणाले. विवेक खटावकर म्हणाले, ढोल-ताशा पथकांचा सहभाग असला, तरी संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. पथकाचे पहिले आवर्तन हे टिळक पुतळ्याजवळ नाही, तर बेलबाग चौकामध्ये होईल. सदस्य संख्या मर्यादित असल्याने मिरवणूक लवकर संपण्यास मदत होणार आहे.

You might also like
Comments
Loading...