गणेशोत्सवात स्तनपानगृहाचा उपक्रम कौतुकास्पद – आ. मेधा कुलकर्णी

Ganpati

गणेशोत्सवाच्या काळात तान्ह्या बाळांना घेऊन माता पुण्याचा गणेशोत्सव पहायला येतात. अशावेळी बाळांना भूक लागल्यावर दूध पाजण्यासाठी छोटा आडोसा देखील त्यांना मिळत नाही. त्यामुळे उत्सवाच्या काळात स्तनपानगृहाची अतिशय आवश्यकता होती.

पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच छत्रपती राजाराम मंडळतर्फे आई आणि तान्हया मुलांचा विचार करीत स्तनपानगृहाचा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला आहे, असे प्रतिपादन आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले. सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने देखाव्याशेजारी साकारलेल्या स्तनपानगृहाचे उद्घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे, विनायक रासकर, रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष संग्रामसिंह शिंदे, स्वप्निल खडके, मनोज शेंडे, प्रतीक झोरे, पृथ्वीराज निंबाळकर, अविनाश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. स्तनपानगृहात लहान मुलांना आवश्यक सर्व वस्तू ठेऊन सुसज्ज असा कक्ष साकारण्यात आला आहे.