गोदावरी एक्सप्रेस’मधील आगळा वेगळा गणेशोत्सव 

godavari express

नाशिक ,अपूर्व कुलकर्णी; गणपती बाप्पा मोरया! असा जयघोष ऐकला कि कान तृप्त होतात. त्यातही हा आवाज एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असला की मग तर सर्वांच्या आनंदाला उधाण येतं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पुढचे १० दिवस गणपतीबाप्पा घराघरांत आणि गल्लीगल्लीत विराजमान होतात. पण आपल्यासोबत बाप्पा रेल्वेतही असले तर..? मग तर त्याच्याइतका सुंदर प्रवास असूच शकत नाही.
नाशिक जिल्ह्यातून मुंबईला नोकरीसाठी दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांनी ‘रेल्वे प्रवासी संघटना’ स्थापन करून १९९७ साली रेल्वेतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. ‘मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस’ मध्ये बाप्पांची स्थापना करण्यात आली. ‘गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळ’ या नावाने सुरु झालेला हा उत्सव गेल्या २१ वर्षांपासून अखंडितपणे सुरु आहे.
समाजात एकता निर्माण व्हावी, सर्व जातीधर्माचे लोक एकत्र यावेत, सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने हा गणेशोत्सव सुरु करण्यात आला.

मंडळाचे सध्याचे अध्यक्ष धनंजय आव्हाड हे आहेत. उत्सवासाठी प्रवासादरम्यान संपूर्ण गाडीतून वर्गणी जमा करण्यात येते. गाडीचा एक डबा स्वच्छ करून सजवला जातो. गणपतीची सकाळची आरती लासलगाव स्टेशनवर तर सायंकाळची आरती नाशिकरोड स्टेशनवर करण्यात येते. आरतीनंतर बाप्पांचा प्रसाद संपूर्ण गाडीतील प्रवाशांना दिला जातो. मनमाड ते मुंबई या संपूर्ण प्रवासादरम्यान गाडीत गणपतीचे भजन आणि गाणी चालू असतात.गणपतीच्या अस्तित्वाने गाडीत चैतन्य निर्माण होऊन प्रवास मंगलमय होतो अशी भावना अनेक सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली आहे.


लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा हेतू लक्षात घेऊन आजही त्याची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या ‘ गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाचा’ उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे आणि साक्षात गणरायांना सोबत घेऊन धावणारी हि ‘गोदावरी’ पण भाग्यवानच म्हणावी लागेल. या निमित्ताने रेल्वेचे अपघात कमी होवोत, सर्वांचा प्रवास सुखकर होवो, आणि भारतीय रेल्वेची भरभराट होवो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना….!