पुणे गणेशभक्तांनी फुलले

पुणे : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध धार्मिक, सामाजिक व ज्वलंत विषयांवर आरास व देखावे तयार केले आहेत. हे देखावे आणि आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे. रस्ते गणेशभक्तांनी फुलल्याच चित्र दिसत आहे. पावसानेही उघडीप दिल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

रात्री उशीरापर्यंत शहरातील मंडळांसमारे आरास पाहण्यासाठी भक्तांच्या रांगा लागत आहेत. यावर्षी गणेश मंडळांनी समाजात विविध विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामाजिक जनजागृतीवर भर दिला आहे. त्यानुसार शहरात मंडळांकडून विविध प्रकारच्या आरास व देखावे तयार करण्यात आले आहे. गणेशोत्सवात शेवटच्या दिवसांमध्ये मंडळांकडून तयार करण्यात आलेले देखावे पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून पुण्यात मोठी गर्दी होत आहे.

शहरातील सदाशिव पेठ, टिळक रोड, मंडई परिसरात रात्री उशीरापर्यंत रस्ते गर्दीने फुलत आहेत. मानाचे पाचही गणपती तसेच श्रीमंत दगडू शेठ गणपती, बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊ रंगारी गणपती, मंडई गणपती या गणपतींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.