देखावे पाहण्यासाठी शहरातील रस्ते गर्दीने फुलले !

पिंपरी, ०२ सप्टेंबर :विजेच्या हजारो दिव्यांचा लखलखाट, पावसाने दिलेली उघडीप, हवेतील मंद गारवा अशा प्रसन्न वातावरणात पिंपरी शहरातील गणेशोत्सव उत्साहाला उधाण आले असून शहराच्या मध्यवर्ती भागातील सारे रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरात गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी सातव्या दिवसांपासून शहरात गर्दी होऊ लागली आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर पहिले दोन दिवस पावसामुळे गणेशभक्तांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.शहरातील मध्यवर्ती भागात सार्वजनिक गणेश मंडळांकडून धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर देखावे साकारण्यात आले आहेत. काही मंडळांनी सजिव देखावे केले, आहेत.

उपनगरांमध्येदेखील गणेश मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांची रेलचेल असल्याने रात्री उशीरापर्यंत शहरात उत्साहाचे वातावरण आहे. पोलिसांनीदेखील शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. मंडळाने देखावे पाहण्यासाठी चोख व्यवस्था केली असल्यामुळे देखावे पाहून नागरिक पुढील देखावा पाहण्यासाठी मार्गस्थ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे

You might also like
Comments
Loading...