‘दगडूशेठ’ समोर २५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण व महाआरती

ॠषीपंचमीनिमित्त पहाटे अथर्वशीर्ष पठण सोहळा ; इंधन वाचवाचा दिला सामाजिक संदेश

पुणे : ओम् नमस्ते गणपतये… गजानना, गजानना…ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल २५ हजार पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत झालेली महाआरती आणि इंधन वाचवाचा संदेश देत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी फिनोलेक्सच्या रितू छाब्रिया, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार डॉ.नीलम गो-हे, पं.वसंतराव गाडगीळ, एमएनजीएलचे वाणिज्यीक संचालक संतोष सोनटक्के, ट्रस्टचे महेश सुर्यवंशी, उल्हास भट, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, अभिजीत कोद्रे, मंगेश सुर्यवंशी, यतिश रासने, राजेश सांकला यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदवी जगताप, मेधा लांडगे, गायत्री वायचळ, मोती माला यांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला सुरुवात झाली. स्वाती नखाते यांच्यासोबत सर्व महिलांनी तीन वेळा ओंकार म्हटला. मानसी प्रभुणे, सायली ताटे, प्रतिभा फडणीस, हेमलता डाबी, अंजली आबादे यांच्यासोबत महिलांनी अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. तर, मयुरी कुलकर्णी, हेमा कुलकर्णी, उत्कर्षा काळे, भाग्यश्री ठकार यांनी घोषामध्ये सहभाग घेतला. त्यांना राजन घाणेकर आणि साधना पोफळे यांनी तबला पेटीची साथसंगत केली. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३२ वे वर्ष होते. एमएनजीएलच्या माध्यमातून हातात झेंडे घेऊन महिलांनी इंधन वाचवाचा देखील संदेश दिला.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

अरुण भालेराव म्हणाले, तब्बल ३२ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा, याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज २५ हजार हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. हेमा सिगेदार यांनी सूत्रसंचालन केले.

 विविध देशांतील परदेशी पर्यटकांची पठणाकरीता उपस्थिती
पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला सहवास संस्थेशी निगडीत असलेल्या फ्रान्स, इस्त्राईल, इटली, मॅस्कीको, पोलंड, तुर्कीसह विविध देशातील ३० हून अधिक परदेशी पर्यटकांनी पठणाकरीता हजेरी लावली. सतिश देसाई यांनी परदेशी पाहुण्यांना ही संधी उपलब्ध करुन देण्यास सहकार्य केले. यावेळी या पाहुण्यांनी गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच हा सोहळा आपल्या कॅमे-यामध्ये टिपला.

Shivjal