fbpx

गौतम गंभीरने घेतला आफ्रिदीचा समाचार म्हणाला…

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने सोमवारी जम्मू-काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही शिफारस मांडली. पीडीपीसह काही खासदारांनी याला आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर सभागृहात या मुद्यावर चर्चा सुरू झाली. चर्चेअंती विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. त्यानंतर राज्यसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर झाले.

भारताच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीनं प्रतिक्रिया दिली होती. भारताने काश्मीरचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रीदीनं संयुक्त राष्ट्रसंघावर नाराजी व्यक्त करत त्याने थेट संयुक्त राष्ट्रसंघावरच प्रश्न उपस्थित करत युएन झोपले आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे त्याच्यावर सोशल मिडीयावर जोरदार टीका झाली आहे.

आफ्रिदीच्या या प्रतिक्रियेवर भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे. त्याने ‘शाहीद आफ्रिदी योग्य बोलतोय. विनाकारण आक्रमकता आहे, मानवतेविरुद्ध अपराध होत आहेत. हा मुद्दा उचलून धरण्यासाठी आफ्रिदीचं कौतुक व्हायला हवं. मात्र तो केवळ एक मुद्दा लिहायला विसरला, तो म्हणजे हे सर्व अत्याचार पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत. पण काळजी करु नको, आम्ही तो मुद्दाही सोडवू, बेटा’ असं गंभीर म्हणाला आहे.

दरम्यान, यापूर्वीही आफ्रिदीने काश्मीर विषयी भाष्य केले होते. लंडनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तो म्हणाला होता की, पाकिस्तानला काश्मीर नको आहे. भारतालासुद्धा तो देऊ नका. काश्मीरला स्वतंत्र ठेवा. यामुळे मानवता जिवंत राहील. पाकिस्तानला त्याचे चार भाग सांभाळणे कठीण आहे. असे वक्तव्य आफ्रिदीने काश्मीरबाबत केले होते.