लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार करणारा गजाआड

औरंंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून परिचारिका असलेल्या युवतीवर करणाऱ्या राजेश प्रेमानंद पवार (वय २८, रा. गोदावरी अपार्टमेन्ट, सिडको महानगर-१, एमआयडीसी वाळुज) याला बेगमपुरा पोलिसांनी गजाआड केले. अटकेत असलेल्या राजेश पवार याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी.तारे यांनी दिले आहेत.

पीडित २६ वर्षीय युवती मुंबईतील एका रूग्णालयात परिचारिका म्हणून नोकरीला आहे. २०१८ साली तिची ओळख राजेश पवार याच्यासोबत झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाल्यावर पवार याने पीडितेला लग्नासाठी मागणी घातली होती. त्यावेळी पीडितेने त्यास नकार दिला होता. त्यानंतर राजेश पवार याने पीडितेला विश्वासात घेत लग्नाचे आमिष दाखवून पुणे, वाळूज अशा विविध ठिकाणी सात ते आठ वेळा तिच्यावर बलात्कार केला होता.

तसेच पीडितेकडून तो वेगवेगळी कारणे सांगून पैसे घेत होता. दरम्यान पीडितेला राजेश पवार याचे लग्न झाले असल्याचे समजल्यावर ती त्याच्यापासून दुर राहण्याचा प्रयत्न करीत होती. २०२१ मध्ये देखील राजेश पवार याने पीडितेवर दुधडेअरी चौकातील एका हॉटेलमध्ये बलात्कार केला होता. या प्रकरणी पीडित तरूणीच्या तक्रारीवरून राजेश पवार याच्याविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या