गडकरींच्या पुढाकाराने आता म्युकरमायकोसीसवरील सात हजारांच इंजेक्शन मिळणार बाराशे रुपयांना !

nitin gadkari

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. हे एक इंजेक्शन तब्बल सात हजार रुपयांना मिळत आहे. या इंजेक्शनचे दर महाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च जात आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मात्र, या इंजेक्शनचा देखील मोठा तुटवडा जाणवत आहे. आता ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स आदींचा तुटवडा जाणवत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. आता म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी देखील गडकरींनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकाराने आता वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्सेस या कंपनीला कोरोना कोरोना काळात होत असलेल्या ब्लॅक फंगस इन्फेक्शन (Mucormycosis) साठीच्या एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन निर्मिती करण्यासाठीची मंजूरी एफडीए महाराष्ट्र कडून देण्यात आली आहे. १५ दिवसांत वर्ध्यात या इंजेक्शनचं उत्पादन सुरु होईल.

‘सध्या हे कंटेंट असलेलं इंजेक्शन सात हजार रुपयांना मिळत आहे. एका रुग्णाला चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत असल्याने मोठा तुटवडा निर्माण होत आहे. वर्ध्यात उत्पादित होणाऱ्या इंजेक्शनची किंमत १२०० रुपये इतकी असणार आहे. तर, दररोज २० हजार इंजेक्शन बनवले जातील,’ अशी माहिती देखील नितीन गडकरींच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP