कोकणसह पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीला गडकरी आले धावून; केली ‘अशी’ मदत

nitin gadkari flood

नवी दिल्ली : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, दरडी कोसळून देखील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण, रायगड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करत योग्य मदत करण्यासह दुरोगामी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रचंड पावसामुळे अनेक घाट भागांमध्ये रस्ते खचले असून काही ठिकाणी पूल देखील वाहून गेले आहेत. पावसामुळे झालेल्या रस्त्यांची दुरावस्था पुन्हा ठीक करून दळणवळण सुरु करण्यासाठी राज्य सरकारला २ हजार कोटींहून अधिक रुपये खर्च येणार आहे.

यासाठी राज्याकडून केंद्र सरकारला खासकरून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मदतीची साद घालण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी व गावापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरात लवकर रस्त्यांची कामे करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. आता गडकरींनी या मागणीला तातडीने प्रतिसाद देत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 52 कोटी रुपये हे तात्तपुरत्या आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी तर 48 कोटी रुपये हे कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी दिल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्टी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता. त्याची दुरुस्ती लगेच करुन 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

यासोबतच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट इथे रस्त्यात आलेले अडथळेही दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असं आश्वासनही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या