नेट संपले तरी चालेल, किमान समान कार्यक्रमामुळे तिन्ही पक्षाचे नेते बोललेच पाहिजे; म्हाडाच्या सोडतीवर गमतीदार प्रतिक्रिया

औरंगाबाद : म्हाडाच्या वतीने बांधण्यात आलेल्या ८६४ घरांची सोडत ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. मात्र, दोन तासांच्या या सोडत समारंभात एक तास ३४ मिनिटे केवळ उपस्थितांचे स्वागत आणि भाषणे सुरू होती. त्यामुळे घरांची प्रतिक्षा करत असलेल्या अर्जदारांना सोडत सुरू होण्याचीही प्रतिक्षा करावी लागली. या सर्वात नेत्यांची भाषणे सुरू असताना अर्जदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया गमतीदार होत्या. काहींनी तर या प्रतिक्रियांचा स्क्रीन शॉट काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा सल्लाही दिलाय.

म्हाडाच्या घरांची सोडत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणार होती. मात्र, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील असा आघाडीचा समान कार्यक्रम इथेही पाळण्यात आला. या तिघांची भाषणे आणि त्यात आधीचे सत्कार आणि म्हाडाचे रटाळ नियोजन यामुळे वैतागलेल्या अर्जदारांनी संतप्त तर काहींनी केविलवाण्या प्रतिक्रीया दिल्या.

‘ज्यांना रोज केवळ दिड जीबी डाटा आहे, त्यांचा तरी विचार करा’ असा प्रेमाचा सल्ला काहींनी दिला. तर ‘माझे बाळ रडतेय लवकर सोडतीची प्रक्रिया पूर्ण करा’, अशी विनंती एका आईने केली. त्यात ‘आधी माझ्या मामाला घरे द्या आणि नंतर सोडत सुरू करा’ असा वशीलाही एकाने लावला. ‘ही राजकारणी लोकं संधी मिळाली की चघळत बसतात’, अशी टीकाही कोणी केली. त्यात ‘वाझेला मोकळा करा मागेल त्यालाच काय न मागताही तो बंगले देईल’ असा खोचक सल्लाही एका अर्जदाराने दिलाय.

यात नेते मंडळींच्या भाषणावर सर्वांनीच टीका केल्याचे दिसून आले. ‘तुमच्याकडे इतका वेळ असेल तर तुम्ही आप-आपसात बोलत बसा, तुमचे झाले की, आम्हाला सोडतीलचा निकाल कळवा’ असा खोचक सल्लाही एका अर्जदारांने या नेत्यांना दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या