शोकाकुल वातावरणात महान व्यंगचित्रकाराला अखेरचा निरोप

mangesh tendulkar

पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्यावर भावपूर्ण वातावरणात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तेंडुलकर यांचं सोमवारी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं. नुकतंच त्यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन पुण्यात भरवण्यात आलं होतं. मनाला चटका लावून जाणाऱ्या त्यांच्या या एक्झिट मुळे 100 प्रदर्शने भरवण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.

1954 मध्ये त्यांनी पहिलं व्यंगचित्र काढलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढलं होतं. त्यांची व्यंगचित्र आणि ललित लेख विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं अनेक वेळा भरली आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला आणि व्यंगचित्राला रसिकांनी खुल्या मनानं दाद दिली.  मंगेश तेंडुलकर एक चांगले व्याख्याते म्हणूनही सुपरिचित होते. तेंडुलकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व स्थरातील मंडळींनी हजेरी लावली

 

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

तेंडुलकर मोठे की त्यांच्या बोटातून उतरलेली व्यंगचित्रे मोठी असा प्रश्न उपस्थित होतोय त्यांनी सामाजिक, आर्थिक घडामोंडिवर मार्मिक टिपणी  केली. त्यांचे विवेकी विचार कायम राहिले. व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रभावी जीवनभाष्य केले. माझे आणि त्याचे मित्रत्वाचे नाते होते. तो मार्मिक बोलायच पण त्याच्या वक्तव्यामुळे कोणीही दुखवले गेले नाही. त्याच्या पत्येक व्यंगचित्रातून शिकायला मिळायचे. त्यांनी सर्वांनाच शिकवल व हसवले सुद्धा. त्यांचे व्यंगचित्र कुसुमाग्रजांच्या कविते सारखा, राजवाडेंच्या संशोधनासारखे प्रभावी होते. सरस्वती चा पुत्र आपल्यातून न कळत दूर गेला. त्याच्या सारखा सच्चा दोस्त वेगळ्या रुपात परत येणार अशी माझी खात्री आहे. माझ्या उर्वतीत आयुष्यात त्याने सुरू केलेले काम मी पूर्ण करणार असे वचन देतो. -शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

पुणेकरांनी ट्राफिक चे नियम पाळावेत म्हणून तेंडुलकर पहिल्यांदा साधारण दीड वर्षांपूर्वी आमची भेट झाली. त्यांचे अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व होते. स्वतःवर व्यंगचित्र काढणे अवघड असते मात्र त्यांनी ते व्यंगचित्र रेखाटले. त्यांच्या सारखा व्यक्ती मिळणे अवघड आहे. त्यांच्या निधनाने न भरुन निघणारी पोखळी निर्माण झाली आहे.  -रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त, पुणे शहर

ऋषीतुल्य व्यक्तीमत्वापैकी तेंडुलकरांचे व्यक्तीमत्व होते. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रीत केले. व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील सद्य परिस्थिती त्यांनी निर्भिड पणे मांडली. सर्वांना सामावून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. त्यांचे मला वैयक्तिक रित्या मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सारखा फक्त दुसर्‍यांचा विचार करणारा व्यक्ती परत होणे नाही.- मुक्ता टिळक, महापौर

तेंडुलकरांनी  शेवटच्या श्वासापर्यंत  फक्त नागरीकांच्या हिताचा विचार केला. भर उन्हात रस्त्यावर उभे राहूण वाहतूकीच्या नियमांची जनजागृती करण्यासारखे उपक्रम त्यांनी वर्षानूवर्ष राबविले. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांवर परखड भाष्य केले. त्यांच्या अध्यक्षिय भाषणातून देखिल त्यांनी जनजागृतीच केली. तेंडुलकरांच्या निधनाने लोकशाहीचा  जणू चौथा स्तंभ हरपला. त्यांची जागा कोणी भरु शकत नाही -सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर 

2011 साली त्यांचा आणि माझी पहिली भेट झाली. त्यांना मी अनेक कार्यक्रमांची निमंत्रणे दिली आणि ते कोणतीही अट न टाकता वेळेच्या आत कार्यक्रमाला हजर राहत असत. ते सच्चा कार्यकर्ता होते. वाहतूकीचे सर्व नियम पाळूनच आपण त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वाहली पाहिजे. – राजेंद्र भामरे, वाहतूक पोलिस अधिकारी 

व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रभावी जिवनभाष्य करणारा व सामाजिक भान असलेला तो सच्चा  कलाकार होता. कला क्षेत्रात त्यांनी नाव कोरलेच मात्र साहित्य क्षेत्रात देखिल त्यांनी स्वतःच्या नावाची छाप पाडली. तेंडुलकरांचे संडे मुड हे पुस्तकांचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले आहे. त्यावेळच्या अनेक गोड आठवणी माझ्या स्मरणात आहे. सहृदय कलावंत अशी त्यांची ओळख राहील. 

– डॉ. न.म.जोशी, ज्येष्ठ साहित्यिक 

 

त्यांच्या व्यंगचित्रातून वा त्यांच्या सामाजिक कार्यातून कधीच वयाचे अंतर जाणवू दिले नाही. आंतराष्ट्रीय विषयापासून ते गल्लीतल्या विषयांपर्यंत त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले. त्यांची कागदावर जोमदार विशिष्ट्य रेषा होती. त्यांच्या निधनाने आमचा आधारवड कोसळला आहे.

– चारुदत्त पंडीत, व्यंगचित्रकार  

 

त्यांनी व्यंगचित्रातून संस्कार घडविण्याचे काम केले. नवीन पिढीसाठी ते उत्तम मार्गदर्शक होते. साहित्याच्या बाजूने त्यांचा सहभाग मोठा होता. प्रत्येक साहित्यिक त्यांचे चाहते होते. त्यांच्या जाण्याने आमच्या सारख्या कलाकारांवर शोककळा पसरली आहे. – दिनकर थोपटे, ज्येष्ठ शिल्पकार 

 

माझी आणि तेंडुलकरांची ओळख राज्य नाट्य पासून ओळख झाली. त्यावेळी ते नाटक परीक्षण लिहायचे. एका नाटकामध्ये मी काम केले होते. मात्र ते नाटक दोन प्रयोगानंतर बंद पडले. त्यावेळी तेंडुलकर म्हणाले होते. बे्रक फेल झालेल्या, इंजिन नसलेल्या ट्रकला बांबू अडवणार कसा अशी मार्मिक टिपणी त्यांनी केली होती. दाढी धरुन कौतुक करणारा तितकेच एळादी गोष्ट न आवडल्यावर स्पष्ट पणे सांगणारा माणूस गेला – राहुल सोलापूरकर (चित्रपट अभिनेते)