fbpx

झोपू योजनेच्या धर्तीवर पोलिस वसाहतींचा पुनर्विकास करुन नवीन इमारतींना निधी दया – शशिकांत शिंदे

पोलीस निरीक्षक

नागपूर  – झोपू योजनेतंर्गत झोपडपट्टीवासियांना ज्याप्रमाणे घरे उपलब्ध करुन दिली जातात त्याच धर्तीवर पोलिसांच्या वसाहतींचा पुनर्विकास करुन नवीन इमारतींच्या उभारणीच्या माध्यमातून जो अधिकचा निधी उपलब्ध होईल त्याचा वापर पोलिसांना सुविधा पुरवण्यासाठी करण्यात यावा अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे पोलिसांच्या समस्येकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील पोलिस सध्या ज्या पोलिस वसाहतीमध्ये राहतात त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सरकार यासाठी अत्यल्प निधीची तरतुद करते.राहत्या घरांच्या दुरावस्थेमुळे पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

पोलिस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना शासकीय निवासस्थान सोडावे लागते त्यामुळे त्यांना तिथे कायम करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ आणि बीआयटी चाळीतील सेवानिवृत्त पोलिस शिष्टमंडळाला दिले होते. त्या प्रश्नाकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारचे लक्ष वेधतानाच त्यांना कायमस्वरुपी तिथे घर देण्यात यावे असा निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

पनवेल येथे पोलिस वसाहत उभारण्याबाबतचा निर्णय राज्यसरकारने जाहीर केला.परंतु त्याची अंमलबजावणी झाली का? त्याची सदयस्थिती काय आहे. त्यासाठी ३०ते ४० कोटी रुपये तरतुद करणे शक्य नाही . त्यामुळे म्हाडा किंवा इतर माध्यमातून पोलिसांच्या वसाहतीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल का ? असे सवाल सरकारला केले. दरम्यान या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पनवेल येथे १०५ एकर जमीन अधिग्रहीत करण्यात येत असून तिथे साडे सात हजार सदनिका करण्याचे नियोजन झाले आहे अशी माहिती सभागृहात दिली.