‘नाम फाऊंडेशन’कडून शहीद राजेंद्र गुजरच्या कुटुंबियांना निधी

रत्नागिरी: अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्तांना मदत करीत असताना ४ जुलै रोजी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. त्यात राजेंद्र गुजर यांना वीरमरण आले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज नाम फाऊंडेशच्या प्रतिनिधींनी गुजर कुटुंबीयांची भेट घेतली. शहीद राजेंद्र गुजर यांना श्रद्धांजली वाहिल्यांतर मदतीचा धनादेश गुजर यांच्या मातोश्री राधाबाई गुजर व वडील निवृत्त मेजर यशवंत गुजर यांना देण्यात आला. त्यानंतर नामच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देण्यात आली.यावेळी नामचे कोकण समन्वयक समीर जानवळकर यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेले नाम फाऊंडेशन भारतीय जवान व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगत फाउंडेशनच्या माध्यमातून जांभूळनगर येथे काही उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी चिपळूण तालुका समन्वयक रमण डांगे, संगमेश्वर तालुका समन्वयक भगवतीसिंह चुंडावंत, दापोली तालुका समन्वयक योगेश पिंपळे, समीर तलाठी, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माणिक कदम, माजी सैनिक नवनाथ साळवी, संघटक रवींद्र इथापे, उपसभापती स्नेहल सकपाळ, सरपंच सुशीला गुजर, उपसरपंच अभिजित कळकीकर, शशिकांत गुजर, नवनीत मपारा, रघुनाथ जोशी, सचिन सकपाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.