पवार साहेबांचा आदेश आणि कार्यकर्ते लागले कामाला; बाजारात फुले पागोट्याच्या मागणीत वाढ

bhujbal pagote

विरेश आंधळकर: आपल्याकडे एखादा पाहूणा आल्यानंतर त्यांचे शाल- टोपी घालून स्वागत करण्याची परंपरा आहे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील फेटे किंवा पगडी घालणं मोठं समजलं जातं. व्यक्ती तशा प्रकृतीप्रमाणे वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यक्रमात वेगवेगळी पगडी -टोप घातले जातात. मात्र यामध्येच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत सुरू झालेले पुणेरी पगडी की फुले पागोट्याच राजकारण सध्या चांगलंच गाजत आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना फुले पागोटे घातल्यानंतर राज्यभरातून पागोट्याच्या मागणीत वाढ झाली आहे. याच सभेमध्ये यापुढे पक्षाच्या सर्व कार्यक्रमात पागोटेच घातले जाण्याची सूचना वजा आदेशच शरद पवार यांनी दिला. आता पवार साहेबांनी सांगितल्यावर मागे राहतील ते कार्यकर्ते कसले. त्यामुळे बाजारामध्ये फुले पागोट्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

फुले पागोटे

पुणे तसेच राज्यभरात पगडीसाठी प्रसिद्ध असणारे मुरुडकर झेंडेवालेचे गिरीश मुरुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार. ‘वेगवेगळ्या संघटना पक्षांकडून झेंडे, फेटे आणि पगड्या विकत घेतल्या जातात. कोणी पुणेरी पगडी घेत तर कोणी दुसऱ्या. सामान्यपणे फुले पागोट्याला मागणी असते मात्र मागील दोन – तीन दिवसांपासून पागोट्याच्या मागणीत वाढ झाली आहे. तर राज्यभरातील इतर शहरातूनही पागोट्याची मागणी केली जात आहे.

पुणेरी पगडी

शरद पवार सांगतात ते कार्यकर्ते करतातच हा अलिखीत नियम आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून सुरु झालेले पागोटा कि पगडीचे राजकारण आणखीन वाढणार आहे. विरोधी पक्षांकडून देखील पवारांच्या पगडी राजकरणावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना खा संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ‘शरद पवार हे कोणतीही कृती जाणूनबुजून करतात परवाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी असंच केलं. त्यांनी पुणेरी पगडी काढून त्याजागी पागोटे घातले, मात्र या पगडी खाली नेमकं दडलंय काय हे येत्या काळात स्पष्ट होईल.