गोरगरीबांची एस.टी. महागणार, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

गोरगरीबांसाठी प्रवासाचे महत्वाचे साधन असलेली लालपरी (एस.टी.) महागणार आहे. इंधन दरवाढ आणि विविध आंदोलनांमध्ये एस.टी. महामंडळाचे होणारे कोट्यावधी रुपयांचे नुकसान पाहता प्रवासी तिकिट भाड्यात वाढ होण्याची शक्यता यापूर्वीच एस.टी. प्रशासनाने वर्तवली होती. गेल्या ९ महिन्यात राज्यात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये एस.टी. महामंडळाचे तब्बल ४५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पेट्रेल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये गेली काही दिवस सातत्याने वाढ होतेय. त्यामुळं तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाचा कारभार डबघाईला आलाय. नियोजनाचा अभाव, अनागोंदी कारभार आणि आर्थिक चणचण असल्यानं महामंडळ हे कायम तोट्यात आहे. खर्च आणि उत्पनानाचं गणित जमवायचं कसं असा प्रश्न महामंडळाला आहे. पैसेच नसल्याने नव्या सुधारणा होत नाहीत आणि नवीन गाड्यांचीही खरेदी करता येत नाही.

डिझेलच्या दरवाढीमुळे हात टेकलेल्या एसटी महामंडळाने 8 ते 9 टक्के दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळला कारभार चालवणं अवघड झालंय. कामगारांचं वेतन आणि त्यात इंधन दरवाढ यामुळे एसटी चा तोटा तब्बल 3660 कोटी रुपयांच्या घरांत पोहचला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याशीवाय इलाज नसल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलीय.