एफआरपीचा प्रश्न पेटला : बच्चू कडूंनी दिला सहकारमंत्र्यांची गाडी अडविण्याचा इशारा

bacchu kadu new

पुणे : सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गतवर्षीचा हंगाम २०१८-१९ मधील सुमारे १४०० कोटी रुपये थकीत प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी शेतकऱ्यांसह साखर आयुक्त कार्यालयावर धडक मारली. थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह मिळण्याची मागणी त्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली.

दरम्यान,प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी संकुलाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली.यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याच कारखान्याची एफआरपीची रक्कम थकीत असल्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत यापुढे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची गाडी अडविण्याचा इशाराही यावेळी दिला.

याप्रसंगी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांच्यासह हिरामन बांदल, चेतना ढमढेरे, विजय माझीरे, अभय पवार, गौरव जाधव, गोरख साळुंखे आदींसह २०० हुन अधिक शेतकरी यावेळी उपस्थित होते.