‘नगर पॅटर्न’मुळे आघाडीत अविश्वासाचे वातावरण

अहमदनगर: पक्षादेश झुगारून भाजपला मदत करणाऱ्या नगरमधील 18 नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशभरात भाजप विरोधी वातावरणात होत असताना नगरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.स्थानिक युती असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याचा परिणाम आघाडीच्या चर्चेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२०१४ साली महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीने भाजपला मोलाची मदत केल्याचे सर्वश्रुत आहे. याच मुद्द्याचे शल्य कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात आहे. सत्तेपासून फार काळ दूर राहू न शकणारे हे दोन्ही पक्ष सध्या भाजपचा पराभव करण्यासाठी पुन्हा एकदा आघाडी करता येईल का याची चाचपणी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत महपौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. आगामी काळात देखील अश्याच प्रकारे राष्ट्रवादीकडून दगाफटका झाला तर ‘प्लान बी’ काय असणार यासंदर्भातील रणनीती आखण्यास कॉंग्रेसने तयारी सुरु केली आहे.

भाजपच्या पराभवासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहेत.हे सगळे सुरु असताना पवारांची भूमिका नेहमी चर्चेचा विषय बनली आहे. कधी ते विविध कार्यक्रमात भाजप नेत्यांच्या सोबत असतात तर कधी विरोधकांसोबत.दरम्यान,राफेलच्या मुद्द्यावरून देखील पवारांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता.यानंतर प्रकरण खूपच वाढल्यानंतर पवारांनी माध्यमांवर खापर फोडलं आणि विषयावर पडदा टाकला.

Loading...

नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला दिलेला पाठिंबा हा राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सोशल मिडीयावर भाजप-राष्ट्रवादीची मोठ्याप्रमाणावर खिल्ली देखील उडविली जात आहे.याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात अविश्वासाचे वातावरण तयार झाल्यास याचा परिणाम थेट जागावाटपावर देखील होऊ शकतो असं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.